स्वप्नील गाडे
रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील कोळवणखडी (खालची मोरेवाडी) येथे झालेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याची रत्नागिरी पोलिसांनी धडक कारवाई करत उकल केली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून स्कॉर्पिओ वाहनासह घरफोडीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री साडेएकच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी अंधाराचा फायदा घेत सदानंद शांताराम मोरे (वय 55) यांच्या घरात प्रवेश केला होता. किचन रूमच्या खिडकीतून व मुख्य दरवाजातून घरात घुसून अंदाजे एक ते सव्वा हजार रुपयांची रोकड असलेला डबा चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 217/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि गोपनीय व तांत्रिक तपासाच्या आधारे हा गुन्हा धाराशिव जिल्ह्यातील मोहा येथील सुनिल पवार व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पुढे आली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजापूर पोलिसांची संयुक्त पथके धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात रवाना झाली. 21 डिसेंबर 2025 रोजी इंदापूर हायवेवर सापळा रचून संशयित आरोपी सुनिल भिमा पवार (वय 27, रा. पारधी वस्ती, मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि अजय उतरेश्वर गवळी (वय 20, रा. पिंपळवाडी, लाखनगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांना स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी दोन साथीदारांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास राजापूर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोउनि. सुधीर उबाळे, श्रेणी पोउनि. संदीप ओगले, पोहवा विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दिपराज पाटील, गणेश सावंत, सत्यजीत दरेकर, रामकृष्ण कात्रे आणि चा.पोकॉ. नितीन घोगले यांनी पार पाडली.


