सातारा प्रतिनिधी
सातारा : राज्यात एमडी ड्रग्जच्या निर्मितीविरोधात सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यात मोठी कारवाई करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेली एमडी ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जावळी तालुक्यातील सावळी (सावरी) गावातील एका जुनाट शेडमध्ये ही फॅक्टरी सुरू होती. शेड जीर्ण अवस्थेत असल्याने परिसरात फारसा संशय निर्माण होत नव्हता. मात्र, येथे एमडी ड्रग्जची निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर काही दिवस पाळत ठेवून नियोजनबद्धरीत्या छापा टाकण्यात आला.
या छाप्यात एक स्थानिक व्यक्ती तसेच फॅक्टरीत काम करणारे तिघे कर्मचारी अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. फॅक्टरीतून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज तसेच निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून जप्त साठ्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई आणि पुण्यात याआधी झालेल्या कारवायांनंतर संशयितांनी सावळी गावात एमडी ड्रग्जची निर्मिती सुरू केल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी कराड तालुक्यातील ओगलेवाडी परिसरात फेब्रुवारी महिन्यात ड्रग्ज जप्तीची कारवाई झाली होती. त्या प्रकरणात १५ जणांना अटक करण्यात आली होती, तर दोघांना परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना २६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
राज्यात एमडी ड्रग्जच्या वाढत्या जाळ्यामुळे तरुणाई गंभीर धोक्यात असल्याने अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत गुन्हे शाखेने दिले आहेत.


