जालना प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान मतदार याद्यांतील त्रुटी, बोगस मतदान आणि गोंधळाचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. जालन्यात अशाच एका घटनेत पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार वापरण्यास आलेल्या तरुणाला स्वतःच्या नावावरच दुसऱ्याने मतदान केल्याचा धक्का बसला.
पुण्यात कामानिमित्त राहणारा आनंद शिंदे हा युवक विशेषतः मतदानासाठी अंबड (जालना) येथे आला होता. प्रभाग क्रमांक १ मधील बूथ क्रमांक ३ वर गेल्यावर त्याच्या नावावर आधीच मतदान झाल्याचं समोर आलं. अधिकाऱ्यांनी तक्रारीकडे उदासीनतेने पाहिल्याने निराश झालेला आनंद काहीही न बोलता थेट पुण्याला परत निघून गेला.
मात्र, ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक विभाग अलर्ट झाला. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी तत्काळ चौकशी सुरू केली. बोगस मतदानाच्या प्रकरणात नियमांनुसार खऱ्या मतदाराला ‘टेंडर्ड व्होट’ देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आनंद शिंदेला पुन्हा मतदानाची संधी देण्यात आली.
तहसीलदार चव्हाण यांनी याबाबत सांगितले की,
“आनंद शिंदे यांना तातडीने मतदार केंद्रावर बोलावून टेंडर्ड व्होटद्वारे मतदानाची संधी देण्यात आली. त्यांनी अधिकृतरित्या आपलं मत टाकलं असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.”
मताधिकार हिरावला जाण्याच्या स्थितीतही निवडणूक यंत्रणेने वेळेत दखल घेत मतदाराचा हक्क सुरक्षित ठेवल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या प्रकरणामुळे बोगस मतदानाच्या गंभीरतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.


