नवी दिल्ली वृत्तसंस्था
अयोध्येतील राममंदिराच्या शिखरावर आज मंगळवारी दुपारी बरोबर १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवून मंदिर पूर्णत्वाच्या नव्या पर्वाची औपचारिक नोंद होणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर ऐतिहासिक धरोहर पुन्हा उजळून निघत असल्याचे या ध्वजारोहणात प्रतीकात्मकरित्या अधोरेखित केले जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.
गेल्या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी व RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली होती. त्या वेळी मंदिराचे संपूर्ण बांधकाम सुरू होते. आता जवळपास दोन वर्षांत उभारलेल्या मंदिराच्या अंतिम टप्प्याला ऐतिहासिक मुद्रेची नोंद देण्यासाठी हा ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
उत्तर भारतीय नागर शैलीत बांधलेल्या शिखरावर भगवा ध्वज फडकवला जाणार आहे. तर दक्षिण भारतीय स्थापत्य परंपरेची झलक दाखवणारा सुमारे ८०० मीटर परकोटा मंदिर संकुलाला वेढा घालत असून, देशातील विविध स्थापत्य प्रवाहांचे अद्वितीय मिश्रण मंदिरात पाहावयास मिळते. संपूर्ण भिंतीवर वाल्मिकी रामायणातील ८७ प्रसंगांचे सुबक शिल्पांकन करण्यात आले आहे.
दर्शन, परिक्रमा आणि ध्वजारोहण
पंतप्रधान मोदी आज सकाळी १० वाजता सप्तमंदिर संकुलातील वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य आणि वाल्मिकी या ऋषी मंदिरांना प्रथम भेट देतील. त्यानंतर ते शेषावतार मंदिर, माता अन्नपूर्णा मंदिर व रामदरबार गर्भगृहास भेट देणार असून ध्वजारोहणापूर्वी रामलल्लाचे दर्शन घेतील. यानंतर मुख्य शिखरावर भगवा ध्वज फडकवून ते जनतेला संबोधित करतील.
ध्वज : धैर्य, तेज आणि सांस्कृतिक सातत्याचे प्रतिक
१० बाय २० फूट आकाराचा त्रिकोणी भगवा ध्वज तेजस्वी सूर्य, ‘ॐ’ आणि कोविदार (रक्तकांचन) वृक्षाच्या प्रतीकांनी सुशोभित आहे. शौर्य, दैवी ऊर्जा आणि अखंड सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या या चिन्हांमुळे ध्वजाचे आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
अयोध्येतील नव्या पर्वाचा साक्षीदार ठरणारा आजचा समारंभ धार्मिक उत्सवाबरोबरच सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरेल, अशी भावना प्रशासन व मंदिर ट्रस्टने व्यक्त केली आहे.


