डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवली | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण क्राईम ब्रँचनं केलेल्या धडक कारवाईत डोंबिवलीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सराईत गुन्हेगार रोशन झा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनवणारी ही कारवाई मानली जात आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच पथकानं देसले पाडा परिसरात सापळा रचला. गोकुळधाम टॉवर या इमारतीत आरोपी राहत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी अचानक छापा टाकला. या छाप्यात रोशन झा हा गावठी पिस्तुलांसह घातक शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यात ३ गावठी पिस्तुलं, ३ जिवंत काडतुसे, २ मॅग्झिन, २ तलवारी, २ चाकू आणि एक खंजीर यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोशन झा याच्यावर उल्हासनगर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.
या आरोपीला काही स्थानिक राजकीय नेत्यांचा आश्रय असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने या प्रकरणाला निवडणुकीच्या तोंडावर अतिरिक्त राजकीय रंग चढला आहे. शस्त्रसाठ्याचा स्रोत नेमका कोणता, ही शस्त्रे कोणाला विकली जाणार होती आणि यामागील रॅकेट किती मोठे आहे, याचा तपास क्राईम ब्रँच करत आहे.
या खुलास्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा गंभीरपणे पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


