विटा प्रतिनिधी
विटा–साळशिंगे रस्त्याजवळील आरटीआय परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात साई गजानन सदावर्ते (३५) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. साडेआठच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी डोक्यात वार करीत केलेल्या हल्ल्यात सदावर्ते गंभीर जखमी झाले होते. नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा खून ‘वयत्यीक कारणातून’ झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून अमीर नझीर फौजदार (३०) या संशयिताला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे, उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सदावर्तेंवर हल्ला अत्यंत जवळून आणि धारदार शस्त्राने झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी विटा पोलिसांत गुन्हा नोंद केला असून हल्लेखोरांचा अचूक माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांशी चौकशी आणि तांत्रिक पुरावे यांची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


