खंडाळा प्रतिनिधी
खंडाळा तालुक्याच्या महसूल प्रशासनात आजपासून नवे पर्व सुरू झाले आहे. तहसीलदार अजित पाटील यांच्या नागपूर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून झालेल्या बदलीनंतर श्री. सुहास थोरात यांनी खंडाळा तहसीलदारपदाचा पदभार स्वीकारला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महसूल खात्यातील पदोन्नती व बदली प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नेमणूक करण्यात आली आहे.
उद्योग संचलनालय, उद्योग विभाग मुंबई येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे सुहास थोरात हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचा अनुभव आणि कारभाराची पद्धत खंडाळा तालुक्याच्या प्रशासनाला अधिक वेग आणि पारदर्शकता देईल, अशी अपेक्षा महसूल विभागाच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी थोरात यांनी खंडाळा तहसील कार्यालयात हजेरी लावून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सेतू केंद्राचे कर्मचारी ओंकार शिर्के आणि धनंजय रासकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शासकीय कामकाजासाठी सेतू केंद्र पूर्ण क्षमतेने सज्ज असल्याची माहितीही त्यांनी तहसीलदारांना दिली.
नव्या तहसीलदारांच्या रूपाने तालुक्याच्या महसुली कामकाजाला नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासन तसेच कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे.


