छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (वय ३०) दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा मृतदेह नळकांडी पुलाजवळ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.
गणेश टेमकर हे गंगापूर तालुक्यातील भालगाव येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. आई-वडील, भाऊ आणि बहिण असा त्यांचा परिवार. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते सक्रिय राजकीय भूमिका बजावत होते. दोन दिवसांपासून ते घराबाहेर निघून परतले नव्हते. नातेवाईक, मित्र आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच सुराग मिळत नव्हता.
दरम्यान, हदियाबाद,मारवाडी महामार्गावरील नळकांडी पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि गौरव विधाते यांनी गंगापूर पोलिसांना दिली. तत्काळ पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला, जिथे डॉक्टरांनी टेमकर यांना मृत घोषित केले.
गणेश टेमकर यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून तो अपघात की घातपात, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने गंगापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून टेमकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


