
तेलंगणा:
तेलंगणा आणि राजस्थानमध्ये रविवारी व सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांत तब्बल ३४ जणांचा करुण अंत झाला. देवउठनी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमावरून परतणाऱ्या राजस्थानातील १५ भाविकांचा मृत्यू झाल्याने वातावरणात शोककळा पसरली आहे.

‘तेलंगणात ट्रक–बसची समोरासमोर धडक, १९ ठार’
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी पहाटे टक्कर देणारी दुर्घटना घडली. चेवेल्ला परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या (आरटीसी) बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रकमधील खडी बसवर कोसळली.
या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. मृतांमध्ये दहा महिलांचा आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. खडी खाली आल्यानंतर अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रात्रभर बचावकार्य सुरू ठेवण्यात आले.
‘राजस्थानात दुःखद घटना; भाविकांचा प्रवास ठरला अखेरचा’
राजस्थानातील जोधपूरच्या फलोदी तालुक्यात रविवारी संध्याकाळी दुसऱ्या अपघातात १५ भाविकांचा जीव गेला. देवउठनी एकादशी निमित्त बीकानेरमधील कोलायत येथील कपिल मुनिंच्या आश्रमात पूजा करून निघालेल्या भाविकांचा हा मृत्यू आहे.
भारतमाला महामार्गावर मतोडा गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरने दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला वाहनाची भीषण धडक बसली.
धडकेची तीव्रता इतकी होती की टेम्पो ट्रॅव्हलरचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला. १५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी आहेत.

डोळ्यांसमोर घडली दुर्घटना
प्रत्यक्षदर्शी महिपाल सारण यांच्या मते, महामार्गालगत छोट्या ढाब्यांमुळे ट्रेलर रस्त्याच्या कडेला उभा होता. भरधाव ट्रॅव्हलरने चुकीचा ओव्हरटेक केल्याने अपघात झाला. धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हलविले
जखमींची उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मृतदेह जोधपूरमधील मथुरादास माथुर व महात्मा गांधी रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठवले असल्याची माहिती ओसिया उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. प्रदीप सिंह चौधरी यांनी दिली.
धार्मिक भावनेने निघालेल्या कुटुंबांवर एकाच क्षणात काळाने घाला घातल्याने दोन्ही राज्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.


