मुंबई प्रतिनिधी
मुंबई : पूर्व उपनगरातील छेडानगर ते आनंदनगर दरम्यान सुरू असलेल्या पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री-वे) विस्तारित उन्नत मार्ग प्रकल्पामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. प्रकल्पाच्या कामांमुळे सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी रस्त्याच्या मधोमध असलेल्या काही मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत. तसेच बॅरिकेड्स, यंत्रसामग्री आणि कामासाठी बंदिस्त केलेले भाग यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी दोन मार्गिका बंद असल्याने उर्वरित मार्गांवर वाहनांचा ताण वाढून कोंडीची समस्या तीव्र झाली आहे.
याचा फटका छेडानगर, आनंदनगर, टिळकनगर, चेंबूर नाका आणि मानखुर्दकडे जाणाऱ्या वाहनांना बसत आहे. मुख्य मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक सेवा रस्त्यांचा वापर करीत असले तरी तेथेही वाहनांची गर्दी वाढल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. अरुंद सेवा रस्ते आणि मालवाहू वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे वाहतुकीचे नियोजन विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. शाळा, रुग्णालये आणि निवासी परिसरांमध्ये ध्वनी व वायू प्रदूषणाची समस्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूककोंडीचा परिणाम बेस्ट बस सेवांवरही होत असून अनेक बस नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती, प्रभावी वाहतूक व्यवस्थापन तसेच अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंगविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील सुरू असलेल्या कामांमुळे प्रवासाचा कालावधी वाढला असून इंधन खर्चातही वाढ होत असल्याने हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


