सातारा प्रतिनिधी
भुईंज : दिवाळी साजरी करण्यासाठी सुटीवर गावी आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अमोल अरुण माने (वय ३४, रा. भुईंज) असे या जवानाचे नाव आहे.
अमोल माने हे मेरठ (दिल्ली) येथील नऊ इन्फंट्री सिग्नलमन रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. ते गेल्या आठ दिवसांपूर्वी दिवाळीच्या सुटीवर गावी आले होते. रविवारी (ता. २६) सायंकाळी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने भुईंज येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती अमोल माने यांना मृत घोषित केले.
जवान माने हे सुटीवर गावी एकटेच आले होते. त्यांची पत्नी व आठ वर्षांचा मुलगा आयुष हे मेरठ येथेच आहेत. सैन्य दलाच्या माध्यमातून त्यांना सोमवारी रात्रीपर्यंत भुईंज येथे आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अमोल माने यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी भुईंज स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, हवालदार शिवाजीराव तोडरमल व वैभव टकले यांनी दिली.
या घटनेने भुईंज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तरुण वयात देशसेवेत असलेल्या जवानाचा असा अकाली मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.


