अहिल्यानगर प्रतिनिधी
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
गेल्या काही महिन्यांपासून तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळीही त्यांच्या भूमिकेची मोठी चर्चा झाली होती. त्या निवडणुकीत तनपुरे यांनी अखेरच्या टप्प्यात उमेदवारी मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी पर्यायी उमेदवार मैदानात उतरवावा लागला होता.
त्या काळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान शनिवारी मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे-पाटील आणि पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तनपुरे यांच्या प्रवेशामुळे भाजपला अहमदनगर जिल्ह्यात बळ मिळणार असल्याचे मानले जात असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.


