मुंबई प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे धुळीला गेलेल्या शेतीच्या आशेवर आता सरकारने दिलासा दिला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठीच्या मदतीबाबत महत्त्वाची घोषणा केली.
फडणवीस यांनी सांगितले की, “सरकारने आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आजच्या बैठकीत आणखी ११ हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. हे निधी पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.”
मुख्यमंत्री म्हणाले, “ही मदत ही बजेटमधील नव्हे, तर विशेष स्वरूपातील आहे. निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील याद्यांनुसार थेट वितरण होणार आहे. कुणीही शंका घेऊ नये, कारण ज्यांना अंशतः रक्कम मिळाली आहे, त्यांना उर्वरित रक्कमही लवकरच मिळणार आहे.”
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “पुढील १५ ते २० दिवसांत राज्यातील ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत पोहोचेल. निधीची कोणतीही कमतरता नाही. जवळपास २१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी ८ हजार कोटी आधीच वितरित झाले, ११ हजार कोटींची मंजुरी आज मिळाली असून पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत.”
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही घोषणा फडणवीस सरकारच्या कामगिरीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता या मदतीचे प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याचीच प्रतीक्षा आहे.


