मुंबई प्रतिनिधी
दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची पहिलीच बैठक वादळी ठरली असताना, प्रशासनिक पातळीवर मोठी हालचाल झाली आहे. राज्य सरकारने मंगळवारी (२८ ऑक्टोबर) सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मंत्रालय, पुणे महानगरपालिका तसेच विविध विभागांमध्ये या फेरबदलांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतानाच, आता पुन्हा एकदा प्रशासनात मोठी उलथापालथ झाली आहे.
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
1. संजय खंदारे (IAS, 1996 बॅच) — प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून बदली.
2. पराग जैन नैनुतिया (IAS, 1996 बॅच) — प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती.
3. कुणाल कुमार (IAS, 1999 बॅच) — यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.
4. वीरेंद्र सिंह (IAS, 2006 बॅच) — सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून बदली.
5. ई. रावेंदिरन (IAS, 2008 बॅच) — मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई यांना सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून बदली.
6. एम. जे. प्रदीप चंद्रन (IAS, 2012 बॅच) — अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे यांना प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे म्हणून नियुक्ती.
7. पवनीत कौर (IAS, 2014 बॅच) — उपमहासंचालक, यशदा, पुणे यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका म्हणून नियुक्ती.
राज्य प्रशासनातील या फेरबदलांमुळे मंत्रालयीन कामकाजाच्या गतीवर आणि विभागीय धोरणात्मक निर्णयांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीनंतर लगेचच झालेल्या या हालचालींना राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही अर्थांनी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.


