 
                सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात येऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये असून, येत्या निवडणुकांमध्ये दोघे एकत्र येणार का, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप पक्षपातळीवर निर्णय घेईल. मी आणि खासदार उदयनराजे भोसले दोघंही भारतीय जनता पक्षात आहोत. पक्षाचा जो निर्णय असेल, त्यादृष्टीने आम्ही वाटचाल करू. जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्याशीही चर्चा होईल आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेतले जातील.
गेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे पॅनेल एकमेकांसमोर उभे होते. मात्र आता दोघेही भाजपमध्ये आल्याने या वेळी ते एकत्र येणार का, याकडे साताऱ्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय बैठकीनंतर मंत्री भोसले यांनी आगामी निवडणुकीच्या रणनितीबाबत संकेत दिले. ते म्हणाले,
“राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री,’एकनाथ शिंदे व अजित पवार,’साताऱ्याला भरभरून निधी देत आहेत. साताऱ्याला ‘सिंगापूर’ करण्याची गरज नाही; तर त्याचं सौंदर्य राखत साताऱ्याचा सातारा ठेवत विकास साधला पाहिजे.”
शिवेंद्रराजेंनी नगरसेवकपदाच्या निकषांवरही मत व्यक्त करताना म्हटलं,
“नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदावर न्याय देणाऱ्या व्यक्तींनाच संधी दिली पाहिजे. शहरासाठी काम करणारा नगरसेवक हवा, केवळ ‘माझा वॉर्ड, माझी गल्ली’ अशी मानसिकता असणारे नाही. राज्यातून आम्ही निधी आणू, पण तो खर्च करताना नियोजनबद्धपणा असला पाहिजे.”
ते पुढे म्हणाले,
“आज सरकार आपलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस साताऱ्याला निधी देत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे भूमिपुत्र आहेत आणि अजित पवार यांचं लक्ष साताऱ्यावर कायम आहे. त्यामुळे आपल्याला ही संधी ओळखून काम केलं पाहिजे.”
साताऱ्याच्या विकासाचा नवा आराखडा तयार होत असतानाच, जिल्ह्यातील दोन्ही ‘राजें’ पुन्हा एकत्र येणार का, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.

 
 
 

