सातारा प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने (वय 40) यांना 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (28 ऑक्टोबर) सातारा येथे शिक्षण अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांच्या 24 वर्षांच्या सेवेनंतर निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीसाठी शाळेमार्फत शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तक्रारदार यांनी संबंधित कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक श्रीमती वैशाली माने यांना भेट दिली असता, त्यांनी “हे काम पूर्ण करण्यासाठी साहेबांना 25 हजार रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी केल्याचे समोर आले.
तक्रारदाराने या संदर्भात 27 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, माने यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी सापळा रचण्यात आला. या सापळ्यात माने यांनी तक्रारदाराकडून 25 हजार रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी त्यांना पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या देखरेखीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केली.


