सातारा प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे १,३५२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या वेळी नीरा-देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. फलटण-शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी एमआयडीसीत मेगा औद्योगिक प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
फलटण येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि भूमिपूजन सोहळ्यात पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
‘दुष्काळमुक्त माणदेशाचा ध्यास’
फलटण ही ऐतिहासिक व सांस्कृतिक भूमी असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “नीरा देवघर, जिहे-कटापूर आणि टेंभू योजनेद्वारे माणदेशाला पाणी देण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. सांगोला, माळशिरस व फलटण तालुक्यांतील दुष्काळी गावांना आता पाणी मिळणार असून हरित माणदेश उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “नीरा देवघर प्रकल्पातील तीन उपसा सिंचन योजनांना सुधारित मान्यता दिली जाणार आहे. माळशिरस तालुक्यातील २२ गावांना पाणीपुरवठा सुरू होईल. दुष्काळमुक्ती हा शासनाचा प्राधान्यक्रम असून लोकांच्या पाठिशी आम्ही आहोत.”
‘फलटणचा सर्वांगीण विकास’
फलटण शहरातील प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे आणि न्यायालयामुळे नागरिकांचे जीवन अधिक सुकर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महामार्ग विकास महामंडळामार्फत पाडेगाव–जिंती–फलटण–शिंगणापूर रस्ता विकसित होईल. माणगंगा नदीचा समावेश ‘अमृत २’ योजनेत करण्यात येणार आहे. फलटण न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत व रुग्णालयात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
फलटण विमानतळाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू असून शक्यता तपासली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांसाठी योजना कायमच राहतील”
मुख्यमंत्री म्हणाले, “लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची वीज बिल माफी योजना बंद होणार नाही. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज दिली जाईल. राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर नेण्याचा निर्णय घेतला आहे.”
‘ग्रामविकासमंत्री गोरे यांची प्रतिक्रिया:
मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, नीरा देवघर कालव्याचे काम आणि इतर प्रकल्पांमुळे फलटण, माण आणि खटाव तालुक्यांतील दुष्काळ दूर होईल. उद्योग आणि वाहतूक क्षेत्रालाही गती मिळाली आहे.
‘प्रमुख विकासकामांचा आढावा’
नीरा देवघर प्रकल्प उजवा मुख्य कालवा (टप्पा २) – बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (लाभ क्षेत्र १२,३१४ हे.)
रक्कम : ९६७ कोटी
* प्रशासकीय भवन – १८.६९ कोटी
* महसूल भवन – ९.७५ कोटी
* नवीन कॉंक्रिट पालखी मार्ग – ७५ कोटी
* प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत तीन रस्ते – २० कोटी
* एमआयडीसी रस्ता (फलटण-गिरवी) – १९८ कोटी (५० किमी), पूर्ण कामाचे लोकार्पण
* तीन नवीन पोलीस ठाणे (फलटण शहर, ग्रामीण, वाठार स्टेशन) – प्रत्येकी १२.२८ कोटी
* ८७ पोलीस निवास इमारती – २७.११ कोटी
‘लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण’
कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना घरकुल, फलोत्पादन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, बचत गट आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत सन्मानित करण्यात आले.
‘शेती आणि उद्योगाला चालना’
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, या प्रकल्पांमुळे १२ हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. औद्योगिक वसाहती आणि रस्ते प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि फलटण परिसराचा सर्वांगीण विकास साध्य होईल


