जळगाव प्रतिनिधी
मराठी मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावातील २५ वर्षीय होतकरू अभिनेता सचिन गणेश चांदवडे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सचिनच्या अकस्मात मृत्यूने मराठी सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सचिनचा आगामी मराठी सिनेमा ‘असुरवन’ हा लवकरच प्रदर्शित होणार होता. मात्र, सिनेमाच्या रिलीजच्या तोंडावरच त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास सचिनने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेतला. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला खाली उतरवून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले, परंतु २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीड वाजता त्याने अखेर मृत्यूशी झुंज हरली.
सचिन चांदवडे हा पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत होता. अभिनयाची आवड असल्याने त्याने नोकरीसोबतच कलाक्षेत्रात पाऊल टाकले. त्याने विविध लघुपट, नाट्यप्रयोगांमध्ये काम केलं असून नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित ‘जमतारा २’ या वेब सीरिजमध्येही तो झळकला होता. तसेच तो कलावंत ढोल-ताशा पथकाचा सक्रिय सदस्य होता.
जळगावमधील उभरत्या कलाकारांमध्ये सचिनचं नाव वेगाने पुढे येत असताना त्याच्या या धक्कादायक निर्णयामुळे परिसरात आणि मराठी चित्रसृष्टीत शोककळा पसरली आहे. कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या या होतकरू कलाकाराच्या जाण्याने चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आहे.


