मुंबई प्रतिनिधी
भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील बी. पी. रोडवरील साईबाबा हॉस्पिटलमागील दाट लोकवस्तीत शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने शिरकाव करून एका घरातील मायलेकींसह एकूण सात जणांवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उर्वरित चार जणांवर सामान्य वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या या परिसरात दाखल झाला. तो एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सकाळच्या सुमारास पारिजात इमारतीच्या बी विंगमधील दरवाजा उघडा असलेल्या फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये बिबट्याने प्रवेश केला. घरात शिरताच त्याने भारती टाक (५५), खुशी टाक (१९) आणि अंजली टाक (२३) या मायलेकींवर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या गळ्या, डोके व हातावर चावा घेत गंभीर जखमा केल्या.
आरडाओरड झाल्यानंतर बिबट्या तेथून पसार झाला. त्यानंतर त्याने जय कृष्णा धाम इमारतीच्या ई विंगमधील फ्लॅट क्रमांक ३२१ मध्ये राहणारे छगनलाल बागरेचा (४८) यांच्यावर हल्ला केला. पुढे सिद्धार्थ नगरमधील पारस इमारतीत श्याम सहानी (१९) व राकेश यादव (५०) यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. या हल्ल्यात एकाचे बोट तुटल्याची माहिती आहे. तलाव रोडवरील द्वारका भवन इमारतीतील फ्लॅट क्रमांक १११ मध्ये राहणारे दीप भौमिक (५२) यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला.
घटनेची माहिती मिळताच मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या पारिजात इमारतीतच असल्याचे लक्षात येताच इमारतीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. बिबट्यामुळे घरात अडकलेल्या मायलेकींना लोखंडी ग्रील तोडून बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने भाईंदर येथील भारतरत्न स्व. पं. भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी अंजली टाक व दीप भौमिक यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न तब्बल साडेचार तास सुरू होते. अखेर बाथरूममध्ये लपलेल्या बिबट्याला सकाळी ११ ते दुपारी ३.१५ या कालावधीत इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात कैद करून नॅशनल पार्कमध्ये हलवण्यात आले.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी भाईंदर पश्चिमेकडील रेल्वेच्या मोकळ्या जागेत बिबट्याचा वावर आढळून आला होता. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना आर्थिक मदत देण्याची आणि नागरी वस्तीत बिबट्याचा शिरकाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.


