म्हसवड प्रतिनिधी
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच रक्ताल्पतेसारख्या समस्यांची वेळीच ओळख पटावी, या उद्देशाने इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च, बेंगळुरू (IIHMR-B) आणि द्वारा हेल्थ फायनान्स, वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथील संत नामदेव महाराज मंदिरात शुक्रवारी (दि. १९) मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात एकूण १२० महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. प्रशिक्षित ‘हेल्थ सखी’ यांच्या माध्यमातून सुरक्षित व शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर महिलांना त्यांच्या हिमोग्लोबीन पातळीची माहिती देण्यात आली. तसेच कमी हिमोग्लोबीन आढळलेल्या महिलांना सकस आहार, जीवनशैलीत आवश्यक सुधारणा आणि पुढील वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते शार्दुल फुटाने, आश्विनी फुटाने, रूपाली जोशी, संगीता दोशी, सुनिता नामदास, उर्मिला गोंजारी आदी उपस्थित होते. तसेच IIHMR-बेंगळुरूचे प्रतिनिधी मोहन आचार्य, द्वारा हेल्थ फायनान्सचे सचिन अय्यर यांच्यासह हेल्थ सखी श्रीदेवी माने, रेश्मा माने, किर्ती मसाळ, सायली शेंडे, दिपाली खांडेकर, मनिषा अतकरे आदींनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
परिसरातील महिलांनी या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी म्हसवड येथील हेल्थ सखी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सायली शेंडे यांनी केले. एकूणच हे आरोग्य शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.


