मुंबई प्रतिनिधी
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक मोठी आनंदवार्ता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाचा दर्जा आणखी उंचावण्याच्या तयारीत असून, आता हा एक्सप्रेसवे 10 पदरी सुपरहायवेमध्ये रूपांतरित केला जाणार आहे.
पूर्वी हा महामार्ग आठ पदरी करण्याची योजना होती. मात्र, वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर आता ती सुधारित करून 10 पदरी करण्यात आली आहे. या विस्तारासाठी अतिरिक्त 1,420 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, एकूण बांधकाम खर्च सुमारे 8,440 कोटी रुपयांवर जाईल. संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च तब्बल 14,260 कोटी रुपये इतका असेल.
एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल. अंदाजानुसार, हे काम सुरू झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर प्रकल्प 2026 पर्यंत सुरू झाला, तर 2029-30 पर्यंत संपूर्ण महामार्ग 10 पदरी होईल, अशी अपेक्षा आहे.
निधी संकलनासाठी ‘हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल’ लागू करण्यात येणार आहे. या मॉडेलअंतर्गत सरकार 40 टक्के निधी उपलब्ध करून देईल, तर उर्वरित 60 टक्के गुंतवणूक खाजगी विकासकांकडून केली जाईल. त्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कौशल्याचा योग्य समन्वय साधला जाईल, असे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.
2002 साली सुरू झालेला हा 94.6 किमी लांबीचा प्रवेश-नियंत्रित एक्सप्रेसवे नवी मुंबईतील कळंबोली ते पुण्याजवळील किवळे असा आहे. आठवड्याच्या दिवशी सरासरी 65 हजार तर शनिवार-रविवारी एक लाखाहून अधिक वाहने या मार्गावरून प्रवास करतात. दरवर्षी वाहनसंख्येत 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होत असल्याने, महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक तीव्र होत चालला आहे.
सध्या खंडाळा घाटातील 13 किमी लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम सुरू असून, त्यामध्ये 10 पदरी विभागाचा समावेश आहे. नव्या विस्तार योजनेत उर्वरित भागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
एमएसआरडीसीच्या मते, सध्या सुट्टीच्या आणि आठवड्याच्या शेवटी दोन तासांचा प्रवास तीन तासांपर्यंत वाढतो. मात्र, या विस्तारीकरणानंतर प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.


