
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : माहीम पोलिस वसाहतीतील इमारत क्रमांक १८ समोर आज (२३ ऑक्टोबर २०२५) सकाळी नाग दिसल्याने परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस सर्पमित्र सचिन मौरे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागाला सुरक्षितरीत्या पकडले.
सचिन मौरे यांनी साप दिसल्याची माहिती तातडीने वनविभागाचे राऊंड ऑफिसर हर्षल साठे तसेच वनपरीक्षेत्र मुंबई रेंज कार्यालयाला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रेस्क्यू किटसह घटनास्थळी पोहोचताच सुमारे ४ फूट लांबीचा अतीविषारी नाग फणा काढून बसलेल्या अवस्थेत दिसला.
सदर नाग अत्यंत चिडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. तथापि, सचिन मौरे यांनी शांतपणे परिस्थिती हाताळत लोकांच्या मनातील भीती दूर केली. सापाबाबत योग्य माहिती देत त्यांनी नागरिकांना सर्पांविषयी जागरूक केले.
यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नागाला सुरक्षितरीत्या पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सर्पमित्र हवलदार सचिन मौरे यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, नागरिकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.