मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील लालबाग- काळाचौकी परिसर आज सकाळी रक्ताने माखला! शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका तरुणाने रस्त्यावरच एका तरुणीवर बेदम मारहाण करत चाकूने जीवघेणा हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी ही तरुणी जवळच असलेल्या एका नर्सिंग होममध्ये धावत शिरली. मात्र संतापलेल्या तरुणाने तिच्या पाठोपाठ नर्सिंग होममध्ये घुसून पुन्हा तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यानंतर स्वतःचाही गळा चिरून घेतला.
घटनेनंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली आणि जखमी दोघांनाही परळच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. काळाचौकी पोलीस तसेच परिमंडळ ४ चे उपायुक्त आर. रागसुधा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर गंभीर जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप अधिकृत पुष्टी दिलेली नसली, तरी ही संपूर्ण घटना प्रेमप्रकरणातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या हृदयस्थानी घडलेला हा हल्ला पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला आहे.


