चंद्रपूर प्रतिनिधी
तुकुम परिसरातील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयासमोर गुरुवारी (२३ ऑक्टोबर २०२५) किरकोळ वादातून एका २७ वर्षीय युवकाचा खून झाल्याने चंद्रपूर शहर हादरले. मृताचे नाव नितेश वासुदेव ठाकरे (रा. वार्ड क्र. १, बेताल चौक, दुर्गापूर) असे असून, तो घटनास्थळीच रक्तबंबाळ अवस्थेत मृत आढळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत वादातून झालेल्या हाणामारीत नितेश ठाकरेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू केला आणि अवघ्या तासाभरात सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अशी आहेत करण गोपाल मेश्राम (२२), यश छोटेलाल राऊत (१९), अनिल रामेश्वर बोंडे (२२), प्रतिक माणिक मेश्राम (२२), तौसिक अजीज शेख (२३) आणि सुजीत जयकुमार गणविर (२५). हे सर्वजण दुर्गापूर परिसरातील रहिवासी आहेत.
या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आणि रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवराव नरोटे, दिपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार सहभागी झाले होते.
पोलिसांच्या तत्पर आणि समन्वित कारवाईमुळे अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लागल्याने नागरिकांनी पोलिस दलाचे कौतुक केले आहे.


