
आडिसा, पुरी
मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात एका १५ वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला आहे. रेल्वे ट्रॅकवर व्हिडिओ शूट करत असतानाच मागून धावत्या ट्रेनने त्याला जोरदार धडक दिली. हा थरारक प्रकार ओडिशातील पुरी जिल्ह्यातील जनकदेवपूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांची अंगावर काटा येतोय.
A 15-year-old boy died after being hit by a train while he was filming a reel on a railway track in Odisha’s Puri.
The incident occurred at the Janakdevpur railway station on Tuesday.
Vishwajeet Sahu, a resident of Mangalaghat, visited the Dakshinkali temple with his mother.
On… pic.twitter.com/tWouD4LQTM— SK Chakraborty (@sanjoychakra) October 23, 2025
मृत तरुणाचे नाव विश्वजीत साहू (वय १५, रा. मंगलाघाट) असे आहे. विश्वजीत आपल्या आईसोबत दक्षिणकाली मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपल्यानंतर तो घरी परतत असताना ट्रॅकजवळ छोटा व्हिडिओ शूट करण्यासाठी थांबला. मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू असतानाच समोरून येणाऱ्या ट्रेनकडे तो लक्ष देत होता, मात्र मागून येणाऱ्या वेगवान ट्रेनने त्याला धडक दिली. काही क्षणांतच तो खाली कोसळला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा मोबाईल फुटेजही समोर आला असून, त्यात विश्वजीत स्वतःचे रेकॉर्डिंग करत असतानाच मागून धावती ट्रेन त्याला उडवून नेते, असे दिसत आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या धोकादायक रील शूटमुळे आधीही अनेक तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात ओडिशातील गंजम जिल्ह्यातील बेरहमपूर येथे २२ वर्षीय यूट्यूबर सागर टुडू रील शूट करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. तो आपल्या मित्रासह दुदुमा धबधब्यावर ड्रोनच्या सहाय्याने व्हिडिओ शूट करत होता. मुसळधार पावसानंतर माचकुंडा धरणातून पाणी सोडल्याने प्रवाह प्रचंड वाढला आणि सागरचा तोल गेला. स्थानिकांच्या प्रयत्नानंतरही त्याला वाचवता आलं नाही.
रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना इशारा दिला आहे.
“रेल्वे ट्रॅक हे सेल्फी किंवा रील बनवण्याचं ठिकाण नाही. काही सेकंदांच्या व्हिडिओसाठी आयुष्य धोक्यात घालू नका.”