
मुंबई प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे असरानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी आज (सोमवार) दुपारी सुमारास अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
असरानी यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दीपावळीच्या उत्सवी वातावरणात आलेली ही दुःखद बातमी चित्रपटप्रेमींसाठी धक्कादायक ठरली आहे. त्यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, “असरानी गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं,” असं त्यांनी सांगितलं.
जयपूर येथे १ जानेवारी १९४१ रोजी जन्मलेल्या असरानी यांनी सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चूड़ियां’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तब्बल पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो चित्रपटांत संस्मरणीय भूमिका साकारल्या.
‘शोले’ चित्रपटातील जेलरची भूमिका त्यांचं नाव अमर करून गेली. “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं…” हा त्यांचा संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजा आहे. त्यांच्या विनोदी शैलीने हिंदी सिनेमाला वेगळं परिमाण दिलं. ‘कोशिश’ (१९७३), ‘बावर्ची’ (१९७२), ‘चुपके चुपके’ (१९७५), ‘छोटी सी बात’ (१९७५) आणि ‘शोले’ (१९७५) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट ठरले.
विनोद आणि भावनांचा सुंदर संगम घडवणारा हा बहुआयामी कलाकार आज नाही, पण त्याचं हास्य आणि संवाद अजूनही प्रेक्षकांच्या मनात घुमत राहतील.