
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याच्या नावाखाली बनावट डिपफेक व्हिडीओ तयार करून फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी फेसबुक अॅड आयडीचा अॅक्सेस चीनमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर गुन्हा सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग) येथे गु.र.क्र. २९३/२०२५, कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३५६(२) बीएनएस सह कलम ६६(क), ६६(ड) आयटी अॅक्ट अंतर्गत नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी शेअर एक्सपर्टचा बनावट व्हिडीओ
फिर्यादी हे सेबी रजिस्टर रिसर्च अनॅलिस्ट आणि सुप्रसिद्ध शेअर एक्सपर्ट असून ते विविध बिझनेस न्यूज चॅनेलवर कंपन्यांच्या शेअर किमतीबाबत अभिप्राय देतात. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सोशल मीडियावर त्यांचाच बनावट डिपफेक व्हिडीओ प्रसारित होत असल्याचे आढळल्याने त्यांनी तात्काळ तक्रार दाखल केली. या व्हिडीओद्वारे नागरिकांना बनावट शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीस प्रवृत्त करून आर्थिक फसवणूक केली जात होती.
सायबर पोलिसांची कारवाई
तपासादरम्यान सायबर पोलिसांनी फेसबुककडून मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरू व ठाणे येथे छापे घालून आरोपींना अटक केली.
अटक आरोपी, ‘जिजिल सॅबेस्टियन (४४), दिपायन तपन बॅनर्जी (३०), डॅनियल आरुमुघम (२५) तिघे बेंगळुरूचे रहिवासी, आणि चंद्रशेखर भिमसेन नाईक (४२) ठाणे येथील रहिवासी.
हे सर्व आरोपी व्हल्युलीप इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि. या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे अधिकारी/कर्मचारी असून, त्यांनी फेसबुक अॅड आयडीचा अॅक्सेस बेकायदेशीरपणे चायनीज नागरिकांना दिला. त्याबदल्यात त्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांची (भारतीय व दुबई चलनातील) रक्कम घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.
गुन्ह्याची पद्धत
डिपफेक व्हिडीओद्वारे लोकांना ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले जात होते. सोशल मीडियावरील या जाहिरातींवर विश्वास ठेवून अनेक जणांनी आपले पैसे गमावले. आरोपींनी मेटा कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करूनही आर्थिक फायद्यासाठी ही फसवणूक सुरू ठेवली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप आयुक्त (सायबर गुन्हे) पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ऑपरेशनचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांनी केले असून पो.नि. किरण अहेर, स.पो.नि. अमित उतेकर, स.पो.नि. नितीन गच्चे, स.पो.नि. संदिप पाचांगणे, स.पो.नि. सविता कदम व त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
१️ सोशल मीडियावरील जाहिरातींना बळी पडू नका.
२️ WhatsApp/Telegram ग्रुपमध्ये सामील होऊ नका.
३️ फक्त SEBI नोंदणीकृत सल्लागारांचाच सल्ला घ्या.
४️ संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
५️ शेअर मार्केट गुंतवणुकीसंबंधी कॉल किंवा मेसेज आल्यास सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की,
“डिपफेक व्हिडीओच्या आमिषाला बळी पडू नका, तुमचा कष्टाचा पैसा सायबर ठगांच्या हाती लागू देऊ नका.”