
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये चढ-उतार सुरू झाले आहेत. या वातावरणात शिवसेना (ठाकरे गट) मध्ये नव्या ‘इनकमिंग’मुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती आणि संस्थाचालक पी. एन. यादव यांनी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला असून, मातोश्रीवर ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं.
या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. यादव यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला जालना जिल्ह्यात बळ मिळालं असल्याचं पक्षातील सूत्रांनी सांगितलं. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पी. एन. यादव यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि “शिवसेनेच्या भूमिकेवर ठाम राहून जनतेच्या हितासाठी काम करू,” असं आश्वासन दिलं.
दरम्यान, या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरलं. “दिवाळीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहील,” असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
ठाकरे यांनी यावेळी दिवाळीनंतर मराठवाडा दौऱ्याची घोषणाही केली. “शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी दिवाळीनंतर मराठवाड्यात दौरा करण्यात येईल,” असं ते म्हणाले.
पी. एन. यादव यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात ठाकरे गटाचं राजकीय पारडं अधिक जड होत असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.