
सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अक्षरशः आनंदाची ठरणार आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सलग सहा दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजपासून (१७ ऑक्टोबर) वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीने दिवाळीला सुरुवात झाली असून, शासकीय कार्यालयांना शनिवारपासून गुरुवारपर्यंत सुट्टी राहणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्याच्या तयारीत आहेत.
• या दिवशी राहणार सुट्टी
तारीख सुट्टीचे कारण
• १८ ऑक्टोबर शासकीय सुट्टी
• १९ ऑक्टोबर शासकीय सुट्टी
• २० ऑक्टोबर नरक चतुर्दशी (सोलापूर जिल्हाधिकारी अधिकारक्षेत्रातील सुट्टी)
• २१ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन निमित्त शासकीय सुट्टी
• २२ ऑक्टोबर दिवाळी पाडवा
• २३ ऑक्टोबर भाऊबीज निमित्त राज्य शासनाने मंजूर केलेली सुट्टी
अर्थात, १८ ते २३ ऑक्टोबरदरम्यान शासकीय कार्यालयांचे दरवाजे बंद राहणार आहेत. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका आणि राज्य शासनाच्या सर्व विभागांना ही सुट्टी लागू राहणार आहे.
• बोनसचाही वर्षाव
सुट्टींसह कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी आणखी एक बातमी म्हणजे दिवाळी बोनस.
राज्य शासनाने विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांचा बोनस, तर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तब्बल ३१ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातील कर्मचाऱ्यांनाही बोनसची तरतूद करण्यात आली आहे.
या सलग सुट्ट्या आणि बोनस जाहीर झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्वत्र सजलेल्या बाजारपेठा, फुलांच्या गंधात भरलेले वातावरण आणि सुट्ट्यांचा आनंद, हे सगळं मिळून सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ‘दिनदिन’ उजळवणारी ठरणार आहे.