
अहिल्याननगर प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६७) यांचे आज, शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
राहुरीचे आमचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिशय पोटतिडकीने काम करणारा नेता पक्षाने गमावला आहे. जिल्हा बँक असो की दूध संघ शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केले. स्वच्छता आणि आरोग्याच्या… pic.twitter.com/8iwL9AqMol— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 17, 2025
काल दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले आणि नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांशी गप्पा मारणारे कर्डिले आज पहाटे अचानक या जगाचा निरोप घेतील, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. पहाटे तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काल प्रदीप मिश्रा यांची भेट, आज एक्झिट
निधनाच्या आदल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी आमदार कर्डिले यांनी अध्यात्मिक गुरू पं. प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली होती. सध्या पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थान परिसरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त पं. मिश्रा जिल्ह्यात आले आहेत. यावेळी कर्डिले यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ही भेट कालच जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती, आणि आज पहाटे त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना हळहळ व्यक्त करायला लावली.
कार्यकर्ते, आप्तेष्टांवर आघात
अखेरपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये मिसळून राहणारे, सर्वसामान्यांचा आधार असलेले नेते आज अचानक काळाच्या पडद्याआड गेले. कर्डिले यांच्या निधनाची बातमी समजताच राहुरी, नेवासा, नगर परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या निवासस्थानी शोकाकुल गर्दी उसळली आहे.
दूध विक्रेत्यापासून ‘किंगमेकर’ आमदारापर्यंतचा प्रवास
साध्या दुग्धव्यवसायातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या कर्डिले यांनी बुऱ्हानगरचे सरपंच म्हणून राजकारणात पहिले पाऊल टाकले. स्थानिक पातळीवरील नेतृत्व, कार्यकर्त्यांशी निगडीत राहण्याची शैली आणि निर्णयक्षम स्वभाव या गुणांमुळे ते राहुरी मतदारसंघाचे सर्वमान्य नेते बनले.
२००९ आणि २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावरून ते विधानसभेत निवडून आले. यापूर्वीही विविध काळात त्यांनी नगर-नेवासा आणि राहुरी मतदारसंघातून एकूण सहा वेळा आमदारकी भूषवली. तसेच राज्यमंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, आणि पक्ष संघटनेतील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.
त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्यापासून राज्यकारभारापर्यंत पोहोचण्याचा आदर्श होता. त्यांच्या ठाम निर्णयशैलीमुळे आणि कधीही शब्द न फिरवणाऱ्या स्वभावामुळे ते ‘दादा’ म्हणून ओळखले जात.
“एक पर्व संपलं…”
कर्डिले यांच्या निधनानंतर जिल्हा आणि राज्यातील राजकीय वर्तुळात “एक मोठं आणि वादळी पर्व संपलं” अशी भावना व्यक्त केली जात आहे. माजी मंत्री, सर्वपक्षीय नेते, सहकारी संस्था प्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.
अहिल्यानगरच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारा एक झगमगता तारा आज कायमचा अस्त झाला. दादा गेले, पण त्यांचा संघर्ष आणि कामाचा वारसा मात्र कायम स्मरणात राहील.