
कोल्हापूर प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाने ‘डिबेंचर’वरील परताव्यात ४० टक्क्यांहून अधिक कपात केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळच्या विरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतला. जनावरांसह काढलेल्या या मोर्चादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली, तर काही आंदोलकांनी थेट गोकुळच्या मुख्य कार्यालयात घुसखोरी करून व्यवस्थापनाला जाब विचारला.
या आंदोलनाचे नेतृत्व गोकुळ संचालिका व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये पुन्हा एकदा सतेज (बंटी) पाटील विरुद्ध शौमिका-अमल महाडिक या गटांतील जुना संघर्ष उफाळून आला आहे.
‘डिबेंचर’ कपातीवरून असंतोष
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) या संस्थेकडे दीर्घकाळासाठी ठेवलेल्या रकमेबाबत शेतकऱ्यांना ‘डिबेंचर’ स्वरूपात परतावा दिला जातो. मात्र अलीकडेच या परताव्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. ४० टक्क्यांहून अधिक कपात केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी ‘गोकुळ जवाब दो’ अशा घोषणांसह शासकीय विश्रामगृहापासून मोर्चाची सुरुवात केली. दुभती जनावरे मोर्चात सहभागी करण्यास पोलिसांनी विरोध केल्याने आंदोलनाच्या प्रारंभीच तणाव निर्माण झाला. आंदोलक व पोलिसांमध्ये ढकलाढकली, झटापट झाली. तरीही मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत ताराबाई पार्क येथील गोकुळच्या मुख्य कार्यालयात पोहोचला. पोलिसांनी प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त शेतकऱ्यांनी दरवाजे बाजूला सारून आत प्रवेश केला.
घोषणाबाजी आणि तणावग्रस्त वातावरण
मोर्चादरम्यान ‘जय श्रीराम’ आणि आमदार अमर महाडिक यांचा जयघोषही देण्यात आला, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले. शेतकऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करून व्यवस्थापनावर प्रश्नांचा भडिमार केला.
‘शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा द्या’
“हे आंदोलन गोकुळविरोधात नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे,” असे स्पष्ट करत शौमिका महाडिक म्हणाल्या, “कापण्यात आलेली रक्कम तातडीने परत मिळावी, अन्यथा दूध दरात योग्य वाढ करावी. गोकुळने शेतकऱ्यांशी केलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही.”
‘दूधपुरवठा बंदकरण्याचा इशारा’
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोतीराम घोडके आणि जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी बुधवारीच इशारा दिला होता की, “गोकुळने कपात केलेली रक्कम तातडीने परत द्यावी. अन्यथा संघाला एक थेंब दुधाचाही पुरवठा केला जाणार नाही, तसेच गोकुळ कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.”
या इशाऱ्यानुसारच आजचा मोर्चा काढण्यात आला असून, आंदोलनानंतर शेतकऱ्यांचे निवेदन गोकुळ प्रशासनाला देण्यात आले आहे.