
पालघर प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील एका खाजगी अनुदानित आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली.
मृत विद्यार्थ्यांची नावे देविदास परशुराम नावळे (इयत्ता दहावी, बीवळपाडा-मोखाडा) आणि मनोज सिताराम वड (इयत्ता नववी, दापटी-मोखाडा) अशी आहेत. हे दोघेही त्या आश्रमशाळेतच शिक्षण घेत होते.
माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास हे विद्यार्थी शाळेच्या परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ गेले. तेथे कपडे सुकवण्यासाठी बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने त्यांनी झाडाला गळफास घेतला. रात्री दीडच्या सुमारास सुरक्षा कर्मचाऱ्यांना ही घटना दिसताच त्यांनी तत्काळ शाळा प्रशासनाला आणि त्यानंतर पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, विद्यार्थ्यांच्या नातेवाईक येण्याआधीच मृतदेह खाली उतरविण्यात आल्याने कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी “आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत,” असे सांगितले.
दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस तपास सुरू असून प्राथमिक चौकशीत कोणतीही चिठ्ठी किंवा वैयक्तिक वाद आढळलेला नाही.
घटनेनंतर पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जाब विचारण्यात येत आहे. संस्थेने मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना तातडीने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
जव्हार-मोखाडा परिसरातील अनेक आदिवासी विद्यार्थी या आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने या घटनेमुळे संपूर्ण आदिवासी विभागात भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता सर्वांच्या नजरा प्रशासनाच्या चौकशी अहवालाकडे लागल्या आहेत. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात ठोस धोरण लागू न झाल्यास, अशा घटना पुन्हा घडू नयेत याची हमी कोण देणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.