
नवी दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित दोन्ही महत्त्वाच्या याचिकांवर आता सुप्रीम कोर्टात एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील उद्धव ठाकरे गटाची याचिका तसेच आमदार अपात्रतेच्या प्रश्नावर सुनील प्रभू यांनी दाखल केलेली याचिका,या दोन्हींची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १२ नोव्हेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
#ShivSena election symbol dispute with the Eknath Shinde group mentioned before #SupremeCourt
Bench: Justices Surya Kant and Joymalya Bagchi
Sr Adv Kapil Sibal: This is that Maharashtra matter I mentioned yesterday
Bench lists case (filed by Sunil Prabhu) alongwith Uddhav… pic.twitter.com/8BR4yypkhV
— Live Law (@LiveLawIndia) October 9, 2025
गुरुवारी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची याचिका आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यास नकार दिला होता, त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या निर्णयाला आव्हान देत प्रभू यांनी मागील वर्षीच सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते.
दरम्यान, बुधवारी न्यायमूर्ती सूर्य कांत, उज्ज्वल भुइया आणि एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली पक्ष आणि चिन्हाबाबतची याचिका आली होती. त्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरणाच्या तातडीची जाणीव करून देत लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. कोर्टाने त्यास मान्यता देत १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली.
गुरुवारी सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी पुन्हा लक्ष वेधले की “हीच महाराष्ट्रातील अपात्रतेसंबंधीची याचिका आहे.” त्यावर खंडपीठाने सांगितले की दोन्ही प्रकरणे एकत्र सुनावणीसाठी ठेवता येतील, मात्र त्यासाठी सरन्यायाधीशांची परवानगी आवश्यक आहे. सिब्बल यांनी तत्काळ त्यास संमती दर्शविली.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात वळण मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या पुढील टप्प्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.