
नवी दिल्ली वृत्तसंस्था
हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरनकुमार (2001 बॅच) यांनी मंगळवारी दुपारी चंदीगडमधील सरकारी निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूरनकुमार हे हरियाणा पोलिस दलात अतिरिक्त महासंचालक (एडीजीपी) पदावर कार्यरत होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे राज्य पोलिस दलासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पूरनकुमार यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी त्यांचे अधिकृत पिस्तूल आढळले आहे, मात्र कोणतीही चिठ्ठी किंवा संदेश पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. प्राथमिक तपासातून ही घटना आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे.
मुलीने पाहिले भयावह दृश्य
ही घटना चंदीगडच्या सेक्टर ११ मधील कोठी क्र. ११६ येथील साउंडप्रूफ बेसमेंटमध्ये घडली. दुपारी घरी परतलेल्या मुलीने पूरनकुमार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. तिने तातडीने पोलिसांना खबर दिली. त्यानंतर चंदीगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. केंद्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांची मदत घेऊन जागेचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सेक्टर १६ येथील रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत जपान दौऱ्यावर
पूरनकुमार यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार या वरिष्ठ आयएएस अधिकारी असून सध्या मुख्यमंत्री नयाबसिंग सैनी यांच्या शिष्टमंडळासोबत जपान दौर्यावर आहेत. घटनेबाबत कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप देण्यात आलेले नाही.
कारकिर्दीत अनेक महत्त्वाची जबाबदारी
पूरनकुमार यांनी हरियाणा पोलिस दलात विविध महत्त्वाची पदे भूषवली होती. अलीकडेच २५ सप्टेंबरला झालेल्या बदल्यात त्यांची सुनारिया, रोहतक येथील पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाचे (पीटीसी) महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. यापूर्वी ते रोहतक रेंजचे एडीजीपी होते. कठोर शिस्त, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट नेतृत्वामुळे ते दलात आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
शोककळा आणि तपास
या घटनेनंतर पोलिस दलासह राज्य सरकारने शोक व्यक्त केला आहे. आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पूरनकुमार यांचा मोबाईल, वैयक्तिक नोंदी व इतर पुरावे तपासले जात आहेत. फॉरेंसिक व बॅलिस्टिक अहवाल आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पूरनकुमार यांच्या निधनामुळे आयएएस-आयपीएस वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, “प्रामाणिक, समर्पित आणि शिस्तप्रिय अधिकारी गमावल्याची पोकळी कधीही भरून निघणारी नाही”, अशा भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.