
नवी मुंबई प्रतिनिधी
ऐरोली येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने नवी मुंबई हादरून गेली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून झालेल्या कथित अपमानानंतर दहावीमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता देशमुख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रबाळे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शहाजी केवळे ही विद्यार्थिनी ऐरोली येथील सुषिलाबाई देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती. ३ ऑक्टोबर रोजी चालू परीक्षेदरम्यान तिच्या बाकाखाली एक कॉपी सापडली. ही कॉपी तिची असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. त्यानंतर मुख्याध्यापिका कविता देशमुख यांनी संपूर्ण वर्गासमोर अनुष्काला अपशब्द बोलून फटकारले. एवढ्यावरच न थांबता तिला ‘झोपडपट्टीवाली’ असे संबोधत सार्वजनिकरित्या अपमानित केल्याचा गंभीर आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे.
या प्रसंगामुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या अनुष्काने त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तिच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रबाळे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला वर्गासमोर अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंतर तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. पुढील तपास सुरू असून सत्य परिस्थिती उघड करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर ऐरोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, अपमानाच्या घटना आणि शिक्षकांच्या वर्तणुकीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची भावना समाजातून उमटत आहे. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाशी अधिक संवेदनशीलतेने वागण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याची चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा जोर धरत आहे.