
नवी मुंबई प्रतिनिधी
कळंबोली येथील खाडीत आढळून आलेला मृतदेह हा रबाळे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सोमनाथ काशीनाथ फापाळे (वय ३८) यांचाच असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. फापाळे हे ४ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. तब्बल २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी मिळाल्याने संपूर्ण नवी मुंबई पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
फापाळे हे रात्रपाळीची ड्युटी संपवून घरी परतण्याच्या मार्गावर असल्याचे सांगून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. बराच काळ शोधाशोध करूनही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यांनी थेट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढत न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
दोन दिवसांपूर्वी तळोजा परिसरातील कळंबोली खाडीत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटवणे कठीण झाले. पोलिसांनी डीएनए तपासणी केली असता मृतदेह फापाळे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शनिवारी आहिल्यानगर जिल्ह्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रथमदर्शनी आत्महत्येचा संशय येत असला, तरी सर्व कोनातून तपास सुरू आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांनी दिली.
या दुर्दैवी घटनेमुळे फापाळे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सहकाऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.