मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक ९३ अर्थात मातोश्रीच्या अंगणातील लढतीत शिवसेना (ठाकरे) गटाने आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. शिवसेना (ठाकरे) गटाच्या उमेदवार रोहिणी कांबळे यांनी शिवसेना (शिंदे) गटाच्या सुमित वजाळे यांचा ४,२१८ मतांनी पराभव करत निर्णायक विजय मिळवला.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील हा प्रभाग पारंपरिकरित्या ठाकरे गटाचा गड मानला जातो. मागील अनेक निवडणुकांमध्ये येथे ठाकरे गटाचाच नगरसेवक निवडून येत असल्याने, यावेळी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. विशेषतः शिवसेनेतील फाटाफुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याने या लढतीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले होते.
या निवडणुकीत ठाकरे गटाच्या रोहिणी कांबळे यांच्यासमोर शिंदे गटाचे सुमित वजाळे यांच्यासह काँग्रेसचे शरद शेजवळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सचिन तांबे अशी चौरंगी लढत होती. त्यामुळे मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी होईल आणि त्याचा लाभ शिंदे गटाला होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता.
मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत हे अंदाज फोल ठरले. रोहिणी कांबळे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवत ४,००० हून अधिक मतांनी विजय मिळवला. या निकालामुळे ‘मातोश्रीचा गड’ अजूनही ठाकरे गटाकडेच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
या विजयानंतर वांद्रे पूर्वेतील शासकीय वसाहत परिसरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणा देत जल्लोष साजरा केला. प्रभाग ९३ मधील हा विजय ठाकरे गटासाठी केवळ एक जागा जिंकण्यापुरता मर्यादित नसून, तो पक्षाच्या राजकीय ताकदीचा आणि परंपरागत बालेकिल्ल्याचा ठाम संदेश देणारा ठरला आहे.


