
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटनेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूशी संबंधित गंभीर दावा केला होता. ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेण्यासाठी पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ उडाला.
या आरोपांना फेटाळत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदम यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. परब यांनी कदमांच्या वक्तव्यांना “बिनबुडाचे आणि खोटे” ठरवत त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.
मात्र, परबांच्या या इशाऱ्यानंतर कदमांनीही पलटवार करत मोठा धमाका केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे कदमांनी जाहीर केले.
कदमांचं प्रत्युत्तर
“अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःचं अज्ञान दाखवलं. मी जे काही म्हटलं ते डॉक्टरांच्या सांगण्यावरून होतं. मग त्या डॉक्टरांवरही परब दावा दाखल करणार आहेत का? खरंच बाळासाहेबांचं पार्थिव दोन दिवस ठेवलं होतं का, याचा तपास सीबीआयने करावा, अशी मी मुख्यमंत्री फडणवीसांना लेखी मागणी करणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” असं कदम म्हणाले.
परबांवर थेट आरोप
“अनिल परबांना आपण काय बोलतो याचं भान नाही. आम्ही नेते मातोश्रीपासून दूर झालो तेव्हा ते कसे मालक झाले? बाळासाहेबांच्या मृत्यू प्रमाणपत्रातही परबांचा काही संबंध आहे का, याबाबत शंका उपस्थित होते,” असा घणाघात कदमांनी केला.
‘कोळीवाड्यात बकरा कापला का?’
कदमांनी पुढे आणखी गंभीर आरोप करत म्हटलं की, “चंद्रग्रहणाच्या रात्री कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा कापण्यात आला होता, अशी चर्चा आहे. त्या वेळी तुमच्यासारखा एक माणूस तिथे दिसल्याचं सांगितलं जातं. बिल्डर, गाडी, बाबा आणि बकरा… या सर्व गोष्टींबाबत खुलासा अनिल परबांनी करावा.”
उद्धव ठाकरेंनाही आव्हान
“मी मातोश्रीत ५० वर्षे आहे, अनिल परब किती वर्षे आहेत हे मला ठाऊक नाही. उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा मला या सर्व घटनेची चौकशी लावावी लागेल,” असा थेट इशाराही कदमांनी दिला.
ठाकरे गट आणि शिंदे गटातील या आरोप,प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.