
सोलापूर प्रतिनिधी
राज्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असतानाच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मानवतेचे हृदय हेलावून टाकणारे चित्र समोर आले आहे. पुराच्या पाण्यात मशिदीत अडकलेल्या एका वृद्ध मुस्लिमाला हिंदू तरुणाने जीवाची बाजी लावून वाचवले.
सीना नदीला आलेल्या पूरामुळे दारफळ गाव जलमय झाले. याच गावातील मशिदीत ७० वर्षीय सिकंदर सय्यद अडकले होते. रात्री उशिरा मशिदीत पाणी शिरले आणि थेट छातीपर्यंत पाणी वाढले. मदतीसाठी कोणीच नाही, त्यामुळे रात्रभर त्यांनी जीव मुठीत धरून काढली.
पहाटे त्यांच्या आर्त हाकेला गावातील सुरेश शिवाजी शिंदे यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी पुराचे पाणी पार करत मशिद गाठली आणि छतावरील पत्रा उचकटून सय्यद यांना सुरक्षित बाहेर काढले.
जाती-धर्माच्या नावावर समाजात कटुता आणि संघर्ष वाढताना दिसतोय. पण संकटाच्या काळात धर्म एकच, मानवतेचा हे दाखवून देणारी ही घटना सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे.