
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बहुचर्चित उद्घाटन अखेर निश्चित झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा समारंभ ८ व ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या उद्घाटनावेळी पंतप्रधान फिनटेक परिषदेलाही उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीत पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील विमानतळ प्राधिकरणाची जमीन हस्तांतरित करण्याचा विषय तसेच ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’संदर्भातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
विमानतळाचे नामकरणही चर्चेत असून, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, असा प्रस्ताव राज्य सरकारने सादर केला आहे. केंद्र सरकार यास अनुकूल आहे आणि प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हा विमानतळ दि. बा. पाटील यांचे नाव धारण करेल, असा मला विश्वास आहे,असे फडणवीस म्हणाले.
पनवेल-उलवेदरम्यान सुमारे १,१०० हेक्टरवर उभारण्यात आलेल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी विशेष सैन्य विमानाने थेट धावपट्टीवर उतरणार असून, त्यानंतर संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतील. त्यानंतर एका विशेष सोहळ्यात उद्घाटनाची घोषणा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.