मुंबई प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)च्या ग्राहकांसाठी एटीएम व्यवहार आता अधिक खर्चिक ठरणार आहेत. मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर एटीएममधून रोख रक्कम काढणे तसेच बॅलन्स चौकशीसारख्या सेवांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात बँकेने वाढ केली आहे.
नवीन नियमानुसार, एसबीआयच्या बचत खातेधारकांनी इतर बँकांच्या एटीएममधून मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्ण केल्यानंतर प्रत्येक रोख रक्कम काढण्याच्या व्यवहारासाठी आता ₹२३ अधिक जीएसटी आकारले जाणार आहेत. यापूर्वी हे शुल्क ₹२१ होते. तसेच बॅलन्स चौकशी किंवा मिनी स्टेटमेंटसारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठी ₹११ अधिक जीएसटी मोजावे लागणार आहेत.
बँक शाखांमधील गर्दी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एटीएमचा वापर केला जातो. मात्र, शुल्कवाढीमुळे एटीएमवर अवलंबून असलेल्या ग्राहकांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः वारंवार रोख रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसू शकतो.
दरम्यान, बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारक, एसबीआयचेच एटीएम वापरणारे डेबिट कार्डधारक तसेच किसान क्रेडिट कार्ड (KCC) खात्यांवर या दरवाढीचा परिणाम होणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
इंटरचेंज फीमध्ये अलीकडेच झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार, इतर बँकांच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहारांची सुविधा कायम राहणार असली, तरी त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी वाढीव शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एटीएम व्यवहार करताना अधिक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.


