मुंबई प्रतिनिधी
नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजप सरकारकडून राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस नेत्यांवर खोटे आरोप करण्यात आले असून, माननीय न्यायालयाच्या निकालामुळे हा खोटेपणा जनतेसमोर उघडा पडला आहे, असा आरोप करत मुंबई काँग्रेसच्या वतीने वरळीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयासमोर आज धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खा. वर्षाताई गायकवाड, काँग्रेसचे मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.

काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, आदरणीय सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर नाहक भ्रष्टाचाराचे आरोप करून तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. मात्र न्यायालयाने ही कारवाई फेटाळून लावल्याने हा ‘सत्याचा विजय’ असून भाजपाचा दुटप्पी कारभार उघड झाला असल्याचा दावा काँग्रेसने केला.
या मोर्चात खासदार वर्षाताई गायकवाड, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश व ब्लॉक पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल तसेच विविध सेल्सचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि अन्यायाविरोधातील लढा काँग्रेस पक्ष थांबवणार नाही, असा निर्धार मोर्चादरम्यान व्यक्त करण्यात आला. कितीही दबाव किंवा सत्तेचा वापर झाला तरी सत्याची बाजू घेऊन जनतेच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहील, असे काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.


