
विरार प्रतिनिधी
नवरात्रीचा पहिला दिवस. शहरात भक्तिगीतांचा गजर, देवीच्या आराधनेची लगबग, सजवलेले मंडप… पण या धार्मिक उत्साहाच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये घडलेली एक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. खड्डेमय रस्त्यांवरून होणाऱ्या मृत्यूचा अध्याय पुन्हा समोर आला आहे.
सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास विरार पूर्व आरटीओ कार्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात प्रताप नाईक (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. नाईक हे ऍक्टिव्हावरून विरार फाट्याकडे जात असताना रस्त्यावरील खोल खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. तोल जाऊन ते खाली पडताच मागून येणाऱ्या टँकरखाली सापडले आणि जागीच ठार झाले.
घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला. “वर्षानुवर्षे खड्ड्यांमुळे मृत्यू होत आहेत, पण जबाबदारी स्वीकारणारे कुणी नाही,” असा सवाल स्थानिकांनी केला. नवरात्रीच्या शुभारंभीच घडलेल्या या अपघातामुळे उत्सवी वातावरणात तणावाचे पसरले आहे.
खड्ड्यांचा बळी गेलेल्या प्रताप नाईक यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे.