
धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात शेतकरी, जनावरे, संसार पुराच्या पाण्यात वाहून जातायत… गावोगाव हाहाकार, शेतशिवारात पाणीच पाणी, संसार उघड्यावर पडलेत. जनतेचा आक्रोश थांबता थांबत नाही. अशा वेळी जनतेचे दुःख पुसायला धावून जाण्याऐवजी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या सांस्कृतिक कार्यक्रमात नाचगाण्यात दंग झाल्या!
तुळजापूरच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही अधिकारी फक्त खुर्चीवर बसल्या नाहीत तर स्टेजवर गाण्यांवर ठेका धरताना दिसल्या. आणि त्याच क्षणी धाराशिवमध्ये जनतेचा संसार पाण्यात बुडत होता. पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा प्रकार म्हणावा लागेल!
२२ सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी मध्यरात्री धाराशिव जिल्हा पावसाने थैमान घालून गेला. घरे कोसळली, शेतं बुडाली, जनावरं वाहून गेली. सकाळी मंत्री मंडळी दौऱ्यावर येऊन परिस्थितीची पाहणी करत होते. तर संध्याकाळी जिल्ह्याचे सर्वात मोठे अधिकारी मात्र सांस्कृतिक महोत्सवाच्या ठेक्यावर नाचत होते! हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांच्या संतापाचा ज्वालामुखी फुटलाय.
पूराने विदारक दृश्य निर्माण केलंय, जनतेचे डोळे पाणावलेत, आणि त्याच वेळी अधिकारी गाणी गातायत… हा विरोधाभास अंगावर काटा आणणारा आहे. सरकारला विचारलं पाहिजे, हीच का प्रशासनाची संवेदनशीलता? पुरात जनतेचं आयुष्य वाहून जात असताना अधिकारी मात्र तबल्याच्या तालावर रंगलेले असतील तर जनतेच्या नशिबाचा न्याय कोण करणार?
धाराशिवच्या जनतेच्या आक्रोशावर प्रशासनाचं नाचगाणं… ही लाजिरवाणी बाब आहे. या घटनेवर जिल्हाधिकारी काय स्पष्टीकरण देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण एक गोष्ट मात्र खरी, पुरात जनता जगण्याची झुंज देत असताना प्रशासनाचा ठेका पाहून लोकांचा रोष उसळलाय आणि सरकारलाच आता धारेवर धरलं जातंय!