
नवी दिल्ली वृत्तसंस्था
काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ‘मतचोरी’चे आरोप करत निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला आहे. गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हजारो मतदारांची नावे यंत्रणेतून वगळल्याचे दाखले सादर केले. विशेष म्हणजे, याप्रकरणी माहिती आता निवडणूक आयोगातूनच मिळू लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आयोगातील गुपिते बाहेर येणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
चुनाव आयोग में हमारे आदमी हैं।
अब चुनाव आयोग के अंदर से हमें 'वोट चोरी' की जानकारी मिलने लगी है। pic.twitter.com/xDrSVwxfoy
— Congress (@INCIndia) September 18, 2025
राहुल गांधी म्हणाले, “आतापर्यंत ही माहिती मिळत नव्हती; मात्र आता निवडणूक आयोगाच्या आतूनच ती आमच्यापर्यंत पोहोचत आहे. हे थांबणार नाही.” काँग्रेसनेही राहुल यांचे विधान सोशल मीडियावर शेअर करत “निवडणूक आयोगात आमची माणसे आहेत” असे म्हटले आहे.
गांधी यांनी कर्नाटकातील आळंद व महाराष्ट्रातील राजुरा या मतदारसंघांतील प्रत्येकी सुमारे सहा हजार मतदारांची नावे संगणकीय प्रणालीद्वारे वगळल्याचे दाखले पत्रकार परिषदेत सादर केले. मतदारयादीत फेरफार करण्यासाठी सॉफ्टवेअर व कॉल सेंटरचा वापर होत असल्याचा त्यांचा ठपका आहे.
कर्नाटकातील एका प्रकरणात बीएलओच्या नातेवाईकाचे नावच वगळण्यात आल्याचे उघड झाले. चौकशीत संबंधित शेजाऱ्याने हे काम न केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई तिसऱ्या व्यक्तीने केंद्रीकृत पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले. काही प्रकरणांत मोबाईल क्रमांकाचा वापर करून मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे पुरावेही राहुल यांनी सादर केले.
यावेळी त्यांनी सूर्यकांत नावाच्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत उपस्थित करून त्याच्या मोबाईल नंबरचा वापर करून १२ मतदारांची नावे वगळल्याचा दाखला दिला. त्याच्यासोबत मतदारयादीतून नाव वगळलेल्या काही महिलाही उपस्थित होत्या.
राहुल गांधी यांनी यापूर्वी “हायड्रोजन बॉम्ब टाकणार” असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आजची पत्रकार परिषद हा केवळ प्रारंभ असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या आरोपांमुळे निवडणूक आयोगातील कार्यपद्धती आणि अंतर्गत शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.