
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने रेल नीरसह इतर पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीत कपात जाहीर केली असून हे नवे दर २२ सप्टेंबर २०२५ पासून देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये लागू होणार आहेत.
रेल नीर हे आयआरसीटीसीतर्फे निर्मित, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी प्रवाशांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी ओळखले जाते. आता एक लिटर रेल नीरची बाटली १५ रुपयांऐवजी १४ रुपयांना, तर ५०० मिलीची बाटली १० रुपयांऐवजी ९ रुपयांना मिळणार आहे.
याचबरोबर, इतर मान्यताप्राप्त पॅकेज्ड वॉटर ब्रँड्सचे दरही समान करण्यात आले आहेत. म्हणजेच, एक लिटरची बाटली १४ रुपये आणि ५०० मिलीची बाटली ९ रुपये दराने मिळेल.
रेल्वेच्या या निर्णयामुळे विशेषत, लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असताना किमती कमी झाल्याने लाखो प्रवाशांचा खर्च कमी होईल.
रेल्वे प्रवासी-अनुकूल धोरणांवर भर देत असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल नीरच्या किमती स्थिर होत्या. अखेर कपात करून रेल्वेने प्रवाशांच्या खिशाला दिलासा दिला आहे.