
मुंबई प्रतिनिधी
एलफिन्स्टन पूल वाहतुकीसाठी इतिहासजमा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) तर्फे एलफिन्स्टन ब्रिज पाडून त्याजागी नवा एलफिन्स्टन उड्डाणपूल तसेच शिवडी–वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उभारण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) रात्री ११.५९ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन आखण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्यांसाठी:
* दादर पूर्वेकडून दादर पश्चिम व मार्केटकडे जाणारे वाहनचालक टिळक पुलाचा वापर करतील.
* परेल पूर्वेकडून प्रभादेवी, लोअर परेलकडे जाणाऱ्यांसाठी करी रोड पुल सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत खुला राहील.
* परेल व भायखळा पूर्वेकडून वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी चिंचपोकळी ब्रिजचा वापर करता येईल.
पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्यांसाठी:
* दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जाणाऱ्यांनी टिळक ब्रिजचा वापर करावा.
* प्रभादेवी, लोअर परेलहून परेल व केईएम, टाटा रुग्णालयांकडे जाणाऱ्यांसाठी करी रोड ब्रिज दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत उपलब्ध राहील.
* सी-लिंक व वरळीमार्गे परेल, भायखळा पूर्वेकडे जाणाऱ्यांना चिंचपोकळी ब्रिज वापरण्याचे निर्देश आहेत.
नो पार्किंग क्षेत्रे
* ना. म. जोशी मार्ग (आर्थर रोड नाका ते धनमिल नाका)
* सेनापती बापट मार्ग (एलफिन्स्टन जंक्शन ते रखांगी जंक्शन)
* महादेव पालव मार्ग (भारत माता जंक्शन ते शिंगटे मास्टर चौक)
* साने गुरुजी मार्ग (संत जगनाडे चौक ते आर्थर रोड नाका)
* भवानी शंकर मार्ग व रावबहादूर बोले मार्ग
* संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग
आपत्कालीन सोय
परेल व प्रभादेवी परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन एमएमआरडीएने दोन रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.
प्रभादेवी रेल्वे स्थानक (पश्चिम)
परेल रेल्वे स्थानक (पूर्व)
या दोन्ही ठिकाणी व्हीलचेअरचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबईकरांनी वाहतूक नियोजनाचा अवलंब करून संयम पाळावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.