
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत तब्बल ३० एकर जागेवर मुंबई उच्च न्यायालयाची नवी व प्रशस्त इमारत उभारली जाणार आहे. सुप्रसिद्ध वास्तुविशारद हफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केलेल्या या आराखड्याला नुकतीच उच्च न्यायालयाच्या सुकाणू समितीकडून मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ३७५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्य मंत्रिमंडळाने याला हिरवा कंदील दिला आहे.
High Court, 3B+G+5 Floor, 60 lakh Sq. ft. IGBC Certified BUA development for 75 court rooms, chambers, arbitration and mediation centre, auditorium, library, amenities for staff/lawyers/litigants, Quarters, garden, plaza other facilities on 30 acres land parcel at Bandra, MUMBAI. pic.twitter.com/LnSwUSVQ3l
— DNT (@haldilal) September 11, 2025
१८८७ मध्ये फोर्ट येथे बांधलेल्या इमारतीत गेल्या १४८ वर्षांपासून न्यायालयीन कामकाज सुरू आहे. मात्र, वाढत्या प्रकरणांचा भार व आधुनिक सोयींचा अभाव लक्षात घेता नव्या इमारतीची गरज भासू लागली होती. त्यामुळेच राज्य सरकारने वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील ३० एकर जागा न्यायालयासाठी उपलब्ध करून दिली आहे. विमानतळ, द्रुतगती महामार्ग, वांद्रे-कुर्ला संकुल व सागरी सेतू या परिसराच्या जवळ असल्याने ही जागा सोयीची ठरली आहे.
नव्या संकुलाचा आराखडा अत्यंत भव्य व आधुनिक सोयीसुविधांनी सजलेला असेल. या इमारतीत एकूण ७५ कोर्टरुम, प्रशस्त प्रतीक्षालये, वाहनतळ, सभागृह, उपहारगृह यांचा समावेश असेल. दोन न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र उद्वाहक (लिफ्ट) व्यवस्था करण्यात येणार आहे. मुख्य इमारतीचा उंचीमान ७० मीटर म्हणजेच २० मजली असून, ६० लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्र या संकुलासाठी वापरण्यात येणार आहे. हे क्षेत्र सहा ओव्हल मैदानाइतके असल्याचे विशेष.
एकूण २४ एकर जागेवर मुख्य इमारत उभारली जाणार असून समोर चार मजली व मागे नऊ मजली असे दोन भाग असतील. तर उर्वरित चार एकरांवर निवासस्थाने उभारली जातील. या भव्य प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी तब्बल २५ वास्तुविशारदांची मदत घेण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलाची वाट पाहणाऱ्या कायदा क्षेत्रातील सर्वांच्याच अपेक्षा आता उंचावल्या आहेत.