पुणे प्रतिनिधी
मानव–बिबट संघर्षाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जुन्नर वनविभागाने महत्त्वाचा निर्णय घेत माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील २० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील ‘ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर (वनतारा)’ येथे स्थलांतरित केले. शनिवारी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून उर्वरित बिबट्यांचेही टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार आहे.
गेल्या दशकभरात जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव–बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील अतिसंवेदनशील भागांमध्ये मानव व पशुधनांवर बिबट्यांकडून हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर संघर्ष क्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र या केंद्राची क्षमता केवळ ५० बिबट्यांपुरती मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर संरक्षित केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला.
यासाठी गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात आलेल्या ‘वनतारा’ केंद्रात ५० बिबट्यांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ६ मार्च रोजी वनतारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील २५ सदस्यीय पथक जुन्नर येथे दाखल झाले.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम विभाग डॉ. जितेंद्र रामगावकर आणि पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० बिबट्यांपैकी पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना (१० नर आणि १० मादी) वातानुकूलित व सुसज्ज बचाव वाहनांद्वारे जामनगरकडे रवाना करण्यात आले. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक लोकेश पाटील, सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, चैतन्य कांबळे तसेच ‘वाइल्डलाइफ एसओएस’ संस्थेचे कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली.
या स्थलांतरादरम्यान सर्व आवश्यक पशुवैद्यकीय तपासणी, सुरक्षित वाहतूक आणि तांत्रिक खबरदारी घेण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. मानव–वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना राबवत असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


