
उमेश गायगवळे, मुंबई
मुंबईतल्या गणेशोत्सवाचं केंद्रस्थान, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि भक्तीचा महासागर म्हणजे लालबागचा राजा. दहा दिवस भक्तिभावानं झोकून देऊन हा उत्सव साजरा करणाऱ्या मुंबईकरांसाठी अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजे भावनिक क्षण. पण यंदाचं लालबागच्या राजाचं विसर्जन भक्तिभावापेक्षा दिखावा, पैसा आणि सत्तेचा गदारोळ यासाठी अधिक चर्चेत राहिलं.
सकाळी ११ वाजता मंडपातून बाहेर पडलेला राजा तब्बल ३३ तासांनी, म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ९ नंतर समुद्राच्या कुशीत विसर्जित झाला. पण या काळात झालेल्या घटना भक्तांच्या मनात अस्वस्थता, रोष आणि दु:खाचं मिश्रण निर्माण करून गेल्या. कारण राजाचं विसर्जन म्हणजे भक्तीचं शुद्ध पर्व असायला हवं होतं; पण त्याला श्रीमंतीचा चमकदार मुखवटा, कार्यकर्त्यांचा उद्धटपणा आणि कोळी बांधवांचा अपमान या सगळ्याचा विटंबनकारक गंध लागला.
गेल्या कित्येक वर्षांपासून लालबागच्या मंडळाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आली आहे. सामान्य भक्त तासनतास रांगेत उभा राहून थकतो, धक्काबुक्की सहन करतो, कधी सुरक्षारक्षकांच्या शिव्याही खातो. आणि त्याच वेळी सेलिब्रेटींसाठी पायघड्या अंथरल्या जातात. श्रीमंतांसाठी व्हीआयपी मार्ग खुला ठेवला जातो. यंदाही यात बदल झाला नाही. उलट अंबानी कुटुंबाच्या उपस्थितीनं हा विरोधाभास अधिक ठळक झाला.
हा राजा एकेकाळी कोळी बांधवांचा होता. त्यांच्या नवसाचा होता. पण हळूहळू तो मंडळाच्या ताब्यात गेला. आणि आता तर धनिकांच्या आश्रयाला पोचला. भक्तांच्या दानातून ‘गब्बर’ झालेले कार्यकर्ते भक्तांच्या श्रद्धेलाच खेळवत आहेत, हे सर्वांनी पाहिलं.
विसर्जनाच्या दिवशी तर परिस्थिती शिगेला गेली. गुजरातमधून आणलेला ‘अत्याधुनिक’ तराफा म्हणजे तांत्रिक किमया दाखवण्याचा दिखावा ठरला. भरती-ओहोटीचं भानच ठेवता आलं नाही. मूर्ती समुद्रकिनारी अडकून बसली. ट्रॉली वाळूत रुतून बसली. बाप्पा कमरेपर्यंत समुद्रात बसलेले पाहून भक्तांच्या हृदयाचा ठाव हरपला. असंख्य भाविकांची धाकधूक वाढली. अखेर समुद्रात उतरले ते स्थानिक कोळी बांधव. ज्या कोळी बांधवांनी पहिल्यांदा नवसाचा हा बाप्पा बसवला होता, त्यांनाच आता विसर्जनातून दूर सारण्यात आलं होतं. पण संकटाच्या क्षणी त्यांनी पुन्हा बाप्पाला मिठी मारून धरून ठेवलं. भरतीचं पाणी ओसरत नाही तोवर ते मूर्तीला धरून बसले. हा क्षण सर्वांनी डोळ्यात साठवला. भक्ती, निष्ठा आणि परंपरा यांच्या जोरावरच राजाचं विसर्जन शेवटी पार पडलं.
या सगळ्या गोंधळात बाप्पानं भक्तांना जणू धडा शिकवलाच. सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेला बाप्पा समुद्रात साध्या रुपात आला. ‘सत्ता, पैसा, दिखावा क्षणभंगुर आहे; भक्ती मात्र शाश्वत आहे’ हा संदेश विसर्जनाच्या प्रत्येक क्षणातून जाणवत राहिला. ज्या कोळी बांधवांना वंचित ठेवलं, त्यांच्यासाठीच बाप्पा सात तास समुद्रकिनारी थांबला. भक्तांच्या अश्रूंनी आणि जयघोषांनी समुद्र किनाऱ्यावरचा प्रत्येक क्षण दुमदुमून गेला.
हा उत्सव भक्तीचा राहणार की फक्त पैशाचा आणि सेलिब्रेटींचा बनणार? कार्यकर्त्यांची मुजोरी, श्रीमंतांसाठी वेगळं वागणं आणि सामान्य भाविकांचा अपमान, हे असंच सुरू राहणार का? लालबागचं मंडळ श्रद्धेच्या बळावर उभं आहे. ती श्रद्धाच जर दुखावली, तर राजा पुन्हा भक्तांच्या हृदयात तितकाच राहील का?
एक गोष्ट मात्र नक्की, यंदाच्या विसर्जनाने लालबागच्या राजाने मुंबईकरांना आरसा दाखवला आहे. भक्तीवर विश्वास ठेवा, पैसा आणि दिखाव्यावर नव्हे. कारण शेवटी समुद्रासमोर, काळासमोर आणि बाप्पासमोरही नतमस्तक व्हावं लागतं.
लालबागच्या राजाच्या विसर्जनानं अनेक प्रश्नही उभे केले
• मंडळाला कोळी बांधवांपासून दुरावून जायचं होतं का?
• आधुनिकतेच्या नावाखाली परंपरेचा बळी का गेला?
• सामान्य भक्तांची गैरसोय, तासन्तास रांगा, धक्काबुक्की याचं उत्तर कोण देणार?
लालबागचा राजा भक्तांच्या अथांग श्रद्धेमुळे जगप्रसिद्ध आहे. पण हीच भक्ती जर पैशाच्या दारात अडकली, तर भक्त आणि बाप्पा यांच्यातला भावनिक धागा तुटेल का?
यंदाच्या विसर्जनाने मात्र एक गोष्ट स्पष्ट केली.
सोन्याचा कळस असो वा अत्याधुनिक तराफा, बाप्पाचं खरं वैभव भक्तांच्या डोळ्यांतील श्रद्धेत आहे.